आजी
पूर्वी आताच्यासारखे प्रत्येकाच्या हातात फोन आणि कॅमेरे नसायचे... गावं शहर खूप दूर असायची...कारण आत्तासारखी दळणवळणाची साधनं समृद्ध न्हवती की प्रत्येकाच्या दारात गाड्यांची रांग न्हवती.. वर्षाकाठी एखाद दोनदाच भेट व्हायची दूरच्या नातेवाईकांची आणि त्यामुळे विलक्षण ओढ असायची भेटीची... अशा साधारण २०-३० वर्षापूर्वीच्या काळातली ही गोष्ट आहे...
आजी....
दरवर्षी उन्हाळ्यात आजी वाट पाहायची आपल्या लाडक्या नातवंडांची. थोरली लेक मुंबईला आणि धाकटी पुण्याला.. दरवर्षी नातवंडं आणि पोरी उन्हाळ्याच्या सुट्टीत न चुकता महिनाभर गावी यायच्याच यायच्या... तेवढाच आराम आणि हक्काची सुट्टी..
लेकी आणि नातवंडं हीच काय ती आजीची संपत्ती.. लेकीबाळी आल्या की आजीच घर हे गोकुळच होऊन जायचं. उन्हाळ्यात सुद्धा दिवाळीच वाटायची तिला.. कुरडया, पापड्या, तिखट, मसाले करायची.. बोटवे.. म्हणजेच शेवया तर हातानेच वळायची.. काय तर म्हणे नातवंडांसाठी! बराच उरक होता म्हातारीला. सकाळी लवकरच उठवायची पोरांना... शेतावर न्यायची.. झाडावरचे आंबे, कैऱ्या काढायला लावायची.. मामासोबत विहिरीत पोहायला पाठवायची..आणि मगच न्याहारी द्यायची.. न्याहारी तरी काय हो... रुपयाची चार-चार बटरं..
पोरं उन्हाळ्यात येणारेत म्हणून दोन-चार पोती धान्य बाजूलाच ठेवायची.. खास पोरांची हौस करायची म्हणून.. तशी बरीच धोरणी होती ती..
बघता बघता सुट्टी संपायला यायची.. जायचा दिवस उजाडायच्या दोन दिवस आधी हीची लगबग सुरु व्हायची... तालुक्याला जायचं असायचं.. मामाला गाडी जुंपायला लावायची.. जाताना राखून ठेवलेली धान्याची पोती बैलगाडीत टाकायला लावायची.. एवढ्याशा पोत्यांसाठी सुद्धा तिला जकात द्यावी लागायची.. गरिबी असूनसुद्धा मामा कधी कुरबुर नाही करायचा...
तालुक्याला गेल्यावर एक नेहमीचा ठरलेलाच फोटोग्राफर असायचा.. त्याच्याच दुकानात न्यायची पोरांना...थोरली.. धाकटी आजूबाजूला आणि मधोमध ती बसायची.. मागे मामाच्या बाजूला प्रत्येकीच्या पोराला अगदी लायनित उभं राहायला लावायची..आणि ते सुद्धा वयानुसार.. पोरांना तर भारी गंमतच वाटायची. कोण किती जाड..किती उंच झालंय ते कळायचं ना...मागचे फोटो बघून. अगदी सोहळाच असायचा तो..
कळायला लागल्यावर नातवंडं सुद्धा खास फोटोसाठी म्हणून ठेवणीतले कपडे घालायची... बऱ्याच फोटोत आजीचं मात्र एकच लुगडं असायचं.. लेकीची, नातवंडांची हौस पुरवता पुरवता हीची लुगडी मात्र विरायची..
नातवंडं आणि लेकी आपापल्या गावाला गेल्यावर हीची मातीनं लिंपलेलि आणि शेणानं सारवलेली भिंत त्या फोटोंनी सजायची..दरवर्षी तिचा भाबडीचा न चुकणार नियमच तो....
जुनं झालं आणि टाकून दिलं असं कधीच होत न्हवत..फाटक लुगडं सुद्धा ती दंड घालून शिवायची...(दंड घालून म्हणजे जर दोन लुगडी फाटली असतील तर दोन्हींमध्ये जो चांगला भाग असेल तो एकमेकांना जोडून शिवायची). किती सुरेख आणि नाजूक शिवण असायची तिची..अगदी अप्रतिम..
आता....नातवंडं सुद्धा दरवर्षी न चुकता दोन दिवस तरी भेटतातच.. आणि त्याच क्रमाने फोटो सुद्धा काढतात..
त्या फोटोमधून आजी आता गळाली आहे..नातवंडांच्या डोळ्यातून टपकणाऱ्या थेंबात आणि चेहऱ्यावरच्या हास्यात.. प्रत्येकाजवळ प्रेमाची एक आठवण ठेवून आजी आता सर्वांच्या हृदयात आहे...
तिची ती मातीनं लिंपलेली आणि शेणानं सारवलेली भिंत आता बरीच भक्कम झाली आहे..पण त्या भिंतीची शोभा काही वाढतच नाही...त्याच भिंतीवर हार घातलेल्या फोटोत आजी मात्र हसत हसत विराजमान आहे ...
©स्वाती शेळके
Khup Chan swati
ReplyDeleteThank you so much :)
Deleteएकदमच भूतकाळात घेऊन जाऊन आमच्या आजीची आठवणी ताज्या झाल्या.. आम्ही नशीबवान होतो म्हणून अस अनुभवास मिळालं..
ReplyDeleteThank you very much.. I feel so glad to make you remember your childhood.. :)
Deleteखुप आवडली गोष्ट
ReplyDeleteThank you so much :)
DeleteKeep writing!
ReplyDeleteSure :) Thank you!
Deletekhup Mast
ReplyDeleteKhup Mast
ReplyDeleteMast swati
ReplyDelete